(धरणगाव-प्रतिनिधी) धरणगाव : येथे नाईट गृप च्या वतीने संत शिरोमणी रविदास महाराज यांच्या जयंतीनिमित्त बस स्थानक जवळील संत रविदास महाराज यांच्या स्मारकास माल्यार्पण करून अभिवादन केले. याप्रसंगी गुरु रविदास यांच्या प्रतिमेस नाईट गृपचे जेष्ठ सदस्य दिपक वाघमारे, राजू ओस्तवाल, राजेंद्र वाघ, समीर भाटिया, ॲड.सागर वाजपेयी, सिताराम मराठे, अजय महाजन, चंदुलाल वाणी, एकनाथ वाघ, आनंद पाटील, प्रतीक जैन, दिपक मराठे, ॲड.मंगेश लोहार, मनिष चौधरी, शिव लोखंडे आदी उपस्थित होते.
अभिवादन प्रसंगी ॲड. मंगेश लोहार यांनी मनोगतात सांगितले की, गुरु रविदास यांचा जन्म १४ व्या शतकात वाराणसीजवळ श्रीगोवर्धनपुर येथे झाला. गुरू रविदास यांचे नाव समाज सुधारक संतांच्या यादीत घेतले जाते. त्यांनी भारतभर फिरून सामाजिक बांधिलकी व एकतेचा संदेश देणारे महान क्रांतिकारी कार्य केल्यामुळे ते ओळखले जातात. त्यांच्या गुरुग्रंथ साहिबमध्ये असलेल्या ४० रचना आजही लोकप्रिय आहेत. गुरु रविदास यांनी जातीय सलोखा कायम टिकविण्यासाठी सबंध भारतभर फिरून समतेचा संदेश दिला म्हणून ते मानवतावादी संत म्हणून सर्वदूर परिचित आहेत. तसेच संत कबीरदास हे त्यांचे समकालीन असल्याचे देखील सांगितले. प्रत्येकांनी संत रविदास महाराज यांच्या मार्गावर वाटचाल करणे जरुरीचे असल्याचे ॲड. लोहार यांनी अभिवादन प्रसंगी सांगितले.
Post a Comment