तहसिलदारांच्या हस्ते धरणगावात निर्माल्य संकलन रथाचे उद्घाटन

 


धरणगाव : येथील श्री संतकृपा बहुउद्देशीय संस्थेचा वतीने आज येथे निर्माल्य संकलन रथ सुरू करण्यात आला. त्याचे उद्घाटन तहसिलदार महेंद्र सूर्यवंशी यांचा हस्ते करण्यात आले.शहरातील विविध मंदिरांमध्ये फुल, बेल, पान, माळा, नारळ असे विविध प्रकारचे साहित्य देवाला अर्पण केले जाते. नंतर ते सर्व निर्माल्य तलावात, नदीत, पाण्याचा डबक्यात, विहीरीत विसर्जित केले जाते. त्यामुळे हे सर्व पाणी दूषित होत असते. काही ठिकाणी निर्माल्य पायदळी तुडवले जाते. त्यामुळे त्याचे पावित्र्य नष्ट होते. या सर्व गोष्टींचे निरीक्षण करून हे सर्व निर्माल्य संकलन करून त्याची व्यवस्थित विल्यवाट लागावी म्हणून येथील श्री संतकृपा बहुउद्देशीय संस्थेचा वतीने निर्माल्य संकलन रथाची संकल्पना सुचली. दर मंगळवारी हा रथ शहरातील चौकात येऊन निर्माल्य संकलन करणार आहे.

सदर रथाचे उद्घाटन तहसीलदार महेंद्र सूर्यवंशी यांच्या हस्ते झाले. तर कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती म्हणून व्यासपीठावर नायब तहसीलदार लक्ष्मण सातपुते, पोलीस निरीक्षक उद्धव ढमाले, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पश्चिम क्षेत्र कार्यवाहक बाळासाहेब चौधरी, माऊली वारकरी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष महामंडलेश्वर हभप भगवानदासजी महाराज, माळी समाजाचे अध्यक्ष रामकृष्ण महाजन, शिवसेना (ऊबाठा) गुलाबरावजी वाघ, हभप सी. एस. पाटील सर, चौधरी समाजाचे अध्यक्ष सुनील चौधरी, मा. नगराध्यक्ष नीलेश चौधरी उपस्थित होते. कार्यक्रमाला सर्व राजकीय पक्षांचे, सामाजिक संस्थेचे, शैक्षणिक संस्थेचे, आर्थिक संस्थेचे पदाधिकारी, डॉक्टर्स असोसिएशनचे सर्व सदस्य, पत्रकार व परिसरातील सर्व समाज बांधव मोठया संख्येने उपस्थित होते. तहसीलदारांनी आपल्या भाषणात सदर कार्यक्रमाचे कौतुक करत अशा पर्यावरण पूरक कार्यक्रमाची समाजात आवश्यकता असल्याचे सांगितले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन आर. डी. महाजन यांनी केले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी पदाधिकारी डॉ. नरेंद्र पाटील, अमोल महाजन, संजय वामन चौधरी, जगदीश मराठे, चंद्रकांत भावसार, सुनील चौधरी सचिन पाटील, नाना महाराज, गुलाब महाजन यांनी परिश्रम घेतले.

0/Post a Comment/Comments