ताडोबा प्रकल्पाची फसवणूक, एजन्सीवर गुन्हे दाखल


चंद्रपूर : ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पात सफारी बुकींग करणाऱ्या एजन्सीने तब्बल 12 कोटींनी फसवणूक केल्याची तक्रार असून या एजन्सीवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. चंद्रपूर वाईल्ड कनेक्टीव्हीटी सोल्युशन या एजन्सीवर गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाला दरवर्षी हजारो पर्यटक भेटी देत असतात.यासाठी बुकिंग करणे गरजेचे असते. ही एजन्सी ते बुकींग करीत होती.सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, एजन्सीने पैसे थकविल्याने जिप्सी चालकांच्या जून आणि जुलै महिन्याच्या वेतनाला उशीर झाला होता. त्याचवेळी या आर्थिक गैरव्यवहाराची चाहूल लागली होती, असे सूत्रांनी सांगितले. करारनाम्यानुसार तीन वर्षांत एकूण 22 कोटी 80 लाख 67 हजार रुपयांच्या देय रकमेपैकी एजन्सीने केवळ 10 कोटी 65 लाखांचा भरणा केला. तर उर्वरित 12 कोटी 15 रुपयांसाठी वारंवार पाठपुरावा करूनही उपयोग न झाल्याने एजन्सीचे संचालक अभिषेक विनोदकुमार ठाकूर आणि रोहित विनोदकुमार ठाकूर यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. विभागीय वनाधिकारी सचिन शिंदे यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी हा गुन्हा दाखल केल्याची माहिती आहे. वन विभागाच्या माहितीनुसार, ताडोबा व्याघ्र प्रकल्पात 338 जिप्सी असून जिप्सी चालकांची थकीत रक्कम सुमारे 3 ते 4 कोटींच्या घरात आहे.

0/Post a Comment/Comments