नवी दिल्ली : गांधी कुटुंबाचे जावई आणि काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांचे पती रॉबर्ट वाड्रा यांनी लोकसभा निवडणूक लढविण्याची इच्छा व्यक्त केली आहे. त्यांनी उत्तर प्रदेशच्या मुरादाबाद येथून निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली. मला राजकारणात यायचे आहे. पण, माझ्या कुटुंबाची आणि पक्षाची इच्छा असेल, तेव्हाच मी निवडणूक लढवेन, असेही ते म्हणाले. मला इतर पक्षात येण्यासाठी अनेकांकडून ऑफर आल्या असल्याचा दावाही वाड्रा यांनी केला आहे. मी राजकीय कुटुंबाशी संबंधित असल्याने माझा छळ होत असून राजकारणात नसताना देखील मला राजकीय लढाई लढावी लागत असल्याचे वाड्रा यांनी म्हटले आहे.
वाड्रा यांनी एका दैनिकाशी बोलताना सांगितले की, एका नेत्याने मला त्यांच्या पक्षात येण्याची ऑफर दिली होती. त्यांच्या पक्षात प्रवेश केल्यास माझ्यावर खटला संपुष्टात येऊ शकते व ईडी आणि तपास यंत्रणापासूनही सुटका होईल, असे त्याने सांगितले. मात्र, माझ्या इच्छेने काही होणार नाही, लोकांना हवे तेच होईल, असे वाड्रा म्हणाले. भाजपने मला जी वागणूक दिली ती लोकांना दिसते आहे. एजन्सीचा गैरवापर करून मला अडचणीत आणण्याचा प्रयत्न करण्यात आला, असे सांगून वाड्रा म्हणाले, मी संसदेत असलो, तर मला बोलता येईल आणि सर्व काही स्पष्ट होईल असे लोकांना वाटते. प्रियांका देशाच्या कोणत्याही कोपऱ्यातून किंवा कुठूनही लढल्या तरी त्या नक्की जिंकतील. कारण लोकांना त्या हव्या आहेत. त्यांच्यावर लोक प्रेम करतात, असे ते म्हणाले.
Post a Comment