भारताचा चंद्रस्पर्शाने इतिहास रचला



बंगळुरु : अखेर 6 वाजून 4 मिनिटांनी तो क्षण आला.. आणि सॉफ्ट लँडींग करीत चांद्रयान-3 अगदी अलगदपणे चंद्रावर उतरलं. अंतराळात भारतानं इतिहास घडविला. दक्षिण ध्रुवावर लँडींग करणारा भारत हा जगातील पहिला देश ठरला. इस्त्रोच्या वैज्ञानिकांसह 140 कोटी भारतीयांनी पाहिलेलं स्वप्न या निमित्ताने पूर्ण झालं. बंगळुरच्या इस्त्रोच्या नियंत्रण कक्षात वैज्ञानिकांनी जल्लोष साजरा केला. त्याचवेळी लाईव्ह असलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला संबोधित करुन अभूतपूर्व यशाबद्धल सर्वांना शुभेच्छा दिल्या, वैज्ञानिकांचं अभिनंदन केलं.चंद्राच्या कोणत्याही भागात यान उतरवणारा भारत हा चौथा देश ठरला आहे. यापूर्वी केवळ अमेरिका, सोव्हिएत युनियन आणि चीनने हे यश मिळवलं आहे.मात्र, चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर ठसा उमटविणारा भारत हा पहिलाच देश ठरला आहे. चांद्रयान-2 चा अनुभव लक्षात घेता ही मोहिम यशस्वी होणार की नाही, याबद्दल साऱ्यांनाच चिंता होती. मात्र, यानाचं लँडीग यशस्वी झाल्याचं नियंत्रण कक्षातील स्क्रीनवरून स्पष्ट होताच देशभरात जल्लोष साजरा झाला. नागरिकांनी एकमेकांचं अभिनंदन केलं. अनेक ठिकाणी फटाके फोडून या यशाचं सेलिब्रेशन करण्यात आलं. नागपुरातीही अनेक ठिकाणी जोरदार आतशबाजी करून आनंद साजरा करण्यात आला.भारतासह जगातील प्रत्येकाच्या नजरा या ऐतिहासिक घटनेकडे लागल्या होत्या. अलिकडेच रशियाची चंद्र मोहिम लुनाच्या कोसळण्याने अपयशी ठरल्याने साऱ्यांच्या नजरा भारताच्या चांद्रयान- 3 कडे लागल्या होत्या. लँडींगचा क्षण जसजसा जवळ येत होता, तशी धाकधूक वाढत होती. बंगळुरुतील इस्त्रोच्या नियंत्रण कक्षातील वैज्ञानिकांचे चेहरे लँडींग यशस्वी होई की नाही, या चिंतेने व्याप्त होते. श्वास रोखले गेले, हात जोडले गेले आणि अनेकांनी डोळे मिटले. बऱ्याच जणांनी प्रार्थना सुरु केली आणि अखेर तो क्षण आला. डींग फत्ते झालं आणि प्रत्येक भारतीयाच्या डोळ्यांत आनंदाश्रू तराळले.


लँडींगचा घटनाक्रम असा घडला-


सायंकाळी 5 वाजून 34 मिनिटांनी यानाच्या लँडर मॉड्यूलच्या सर्व चाचण्या यशस्वीपणे पार पडल्या. त्यामुळं ही मोहीम देखील यशस्वीपणे पार पडणार असल्याचा विश्वास इस्रोनं व्यक्त केला होता. 5 वाजून 44 मिनिटांनी इस्रोच्या मिशन कन्ट्रोलनं लँडर मॉड्यूलला पॉवर डिसेंटची कमांड दिली. यानंतर लँडर मॉड्यूलनं चंद्राच्या पृष्ठभागावर उतरण्याची प्रक्रिया सुरु केली. पुढे चार टप्प्यांमध्ये ही प्रक्रिया पार पडली. यातील पहिला टप्पा हा रफ ब्रेकिंग फेजचा होता. 5 वाजून 56 मिनिटांनी लँडर मॉड्यूलची रफ ब्रेकिंगचा टप्पा यशस्वीपणे पूर्ण झाला. यानंतर अल्टिट्यूड होल्डिंगचा टप्पा सुरु करण्यात आला. यामध्ये विक्रम लँडर हे चंद्रापासून केवळ 7.4 किलोमीटर उंचीवरून आणखी खाली नेऊन 6.8 किमी उंचीवर आणले गेले व हा टप्पा केवळ 10 सेकंदांचा होता.

0/Post a Comment/Comments