सत्याच्या आग्रह धरणारा साहित्यिक काळाच्या पडद्याआड

 


परिवर्तनवादी चळवळीतील क्रांतीची ज्वलंत धगधगती मशाल विझली परखड विचारांचा निखारा शांत झाला




✒️ आबासाहेब राजेंद्र वाघ 

     धरणगाव, ९४२२९४१३३३

[ राष्ट्रीय ओबीसी मोर्चा प्रदेश कार्यकारिणी सदस्य ]


             

             

     हरी रामचंद्र नरके

     जन्म: १ जून, १९६३ 

     मृत्यू: ९ ऑगस्ट, २०२३



संशोधनात्मक इतिहासाचा साठा असलेला कुशाग्र बुद्धीचा विचारवंत,शाश्वत सत्य साहित्य जगासमोर मांडणारा साहित्यिक.... चळवळीतील अनेक ऐतिहासिक संदर्भ आणि त्याचे सत्य आकलन सांगणारा विश्वकोश म्हणजे प्रा.हरी रामचंद्र नरके.... तात्यासाहेब ज्योतीबा फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचा सच्चा अनुयायी, मराठी लेखक, अभ्यासू संशोधक, वक्ते आणि उच्च कोटीचा मराठी ब्लॉगर, शिवराय, फुले, शाहू, आंबेडकर आणि बहुजन संत - महात्म्यांच्या विचारांची व कार्याची प्रस्तुतता अधिक चांगल्या प्रकारे अधोरिखित करणे आणि शासकीय पातळीवर वेगाने निर्णय घडून आणण्यामध्ये प्रा. नरके यांचा मोलाचा वाटा होत.

मराठी भाषा ही संस्कृत, कन्नड, तेलगू याप्रमाणे एक अभिजात भारतीय भाषा आहे हे सिद्ध करण्यासाठी नेमलेल्या रंगनाथ पठारे समितीच्या अहवालात प्रमुख समन्वयक म्हणून प्रा. हरी नरके यांचे मोलाचे योगदान दिले. त्यांनी त्यांच्या कारकिर्दीत तब्बल ५६ पुस्तकांचे लेखन संपादन केले. महाराष्ट्र शासनाने समग्र महात्मा फुले हा एक हजार पानाचा ग्रंथ अद्ययावत करून प्रकाशित केला, त्याचे संपादक प्रा.हरी नरके होते.डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या समग्र वाङ्मयाचे राज्य शासनाने २६ खंड प्रकाशित केले होते. व त्यांचे संपादन प्रा.हरी नरके यांनी केले होते. अनेक दुर्लक्षित पैलू त्यांनी समोर आणले होते. महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाचे सदस्य देखील होते. तसेच भांडारकर प्राच्यविद्या संस्थेवर उपाध्यक्ष देखील होते. प्रो.हरी नरके यांची दोन पुस्तके प्रसिद्ध आहेत. महात्मा फुले यांची बदनामी : एक सत्यशोधन" आणि "महात्मा फुले - शोधाच्या नव्या वाटा" या दोन पुस्तकांचा समावेश आहे. 

पेशाने ते प्राध्यापक आणि महात्मा फुले अध्यासनाचे प्रमुख म्हणून, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ येथे कार्यरत होते. ते सामाजिक प्रश्नांचे अभ्यासक व परखड भाष्यकार होते. राष्ट्रपिता महात्मा ज्योतीबा फुले, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या साहित्याचे अभ्यासक, संशोधक, व्याख्याते ही त्यांची ओळख होती. प्रा. हरी नरके यांनी अनेक शासकीय समित्यांवर तज्ञ सदस्य म्हणून काम केलं आहे. प्रा.हरी नरके यांच्या विविध नियतकालिकांमधून प्रसिद्ध झालेल्या लेखांचे विषय ज्वलंत  आहेत. ओबीसी आरक्षणाच्या प्रश्नावरून समता परिषदेच्या माध्यमातून त्यांनी सत्ताधाऱ्यांना अनेकदा धारेवर धरलं होतं. 

निवृत्तीनंतरही ते सामाजिक वैचारिक चळवळीचे काम करतच होते त्याचप्रमाणे सोशल मीडियावर ते नेहमी कार्यरत असायचे अनेक विषयावर त्यांनी स्पष्ट भूमिका घेतल्याचे सर्वश्रुत आहे. तात्यासाहेब ज्योतीबा फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवन चरित्रावर विपुल लेखन करणारे सच्चे अनुयायी, ओबीसी हक्कांसाठीच्या चळवळीत आघाडीवर राहून लढणारा कृतीशील लढवय्या कार्यकर्ता आपण गमावला आहे. ओबीसी हक्कांसाठीच्या चळवळीत आघाडीवर राहून लढणारा कृतीशील योद्धा प्रा.हरी नरके या दीपस्तंभाची अचानक झालेली अखेर माझ्यासह अनेकांना चटका लावून गेल्याने सकल बहुजन समाज एका पुरोगामी चळवळीला मुकला आहे. दुर्बल, वंचित, उपेक्षित आणि दुर्लक्षित बांधवांची बाजू मांडणारं, ओबीसी चळवळीला वाहून घेतलेलं बुद्धीवादी व्यक्तिमत्वं हरपलं आहे. बहुजन सेनापतीचा आजाराने बळी घेतल्याने एक क्रांतिकारी पर्व संपले. निर्भीडपणे सत्य इतिहासाची मांडणी करून असत्याचा विकृत इतिहास जगाच्या वेशीवर टांगणारा इतिहासकार आता इतिहासात बघायला / पाहायला मिळणार. प्रतिक्रांतीचे प्रतिगामी सैन्य सुधारीत, सामाजिक व्यवस्था बदलाच्या दिशेने एक एक पाऊल पुढे सरकत असताना, सामाजिक समतेच्या शिवराय - फुले - शाहू - आंबेडकरी क्रांतीच्या लढ्यातील एक-एक योद्धा निघून जात आहे, हे खूप वेदनादायी आहे.

0/Post a Comment/Comments