मुंबई : राज्यात पावसाने दडी मारली असताना शेतकऱ्यांचे हातचे पीक वाया जाण्याचा धोका निर्माण झाला असून राज्यात दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा,अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी ट्विटच्या माध्यमातून केली आहे.खासदार सुळे म्हणाल्या की, जून महिना कोरडा गेल्यानंतर जुलैमध्ये काही प्रमाणात पाऊस झाला. मात्र, पुन्हा ऑगस्ट महिना संपत आला तरी म्हणावा तसा पाऊस झाला नाही. पावसाने दडी मारल्याने बळीराजा चिंतेत आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यांत सरासरीपेक्षा कमी पावसाची नोंद झाली आहे. मराठवाड्यासह पश्चिम महाराष्ट्रातील अनेक जिल्हे तहानलेलेच आहेत. विदर्भातील काही जिल्हे आणि कोकणात काही प्रमाणात पावसाने हजेरी लावली आहे. मात्र, अन्य भागात पावसाने दडी मारल्याचं चित्र दिसत असून हातची पीके वाया जाण्याची भीती निर्माण झाली आहे. हे पाहता या शेतकऱ्यांना पीक विम्याचा लाभ मिळणे आवश्यक असल्याचे सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे.राज्य सरकारने तातडीने दुष्काळ जाहीर करावा व पाण्याचे टँकर, जनावरांसाठी चारा छावण्या व इतर दुष्काळाची कामे हाती घ्यावी, असेही त्या म्हणाल्या.
Post a Comment