मायएफएमचे आर जे राजन यांचे ह्रदयविकाराने निधन
नागपूर : रेडिओच्या माध्यमातून घरोघरी पोहचलेला ख्यातनाम आर. जे. राजन यांचा आवाज यापुढे का येणार नाही. "माय एफएम का बडा राजन' अशी प्रसन्न साद घालणारा 94.3 मायएफएम या लोकप्रिय खासगी रेडिओ वाहिनीतील ख्यातनाम आर. जे. राजन उपाख्य राजेश अलोणे याचे शनिवारी सकाळी हृदयविकाराने निधन झाले. दररोज सकाळी आपल्या वेगळ्या शैलीत प्रसन्न आवाजात साद घालत नागपूरकरांना गुडमॉर्निंग करणारा हरहुन्नरी, हसतमुख रेडिओ जॉकी राजन हा शनिवारी जगाला कायमचा गुडबाय करीत अनंताच्या प्रवासाला निघून गेला. "माहोल मार्निंग', "पुरानी जिन्स' व "चाँदनी राते' हे त्यांचे लोकप्रिय शो होते."माहोल मार्निंग'मध्ये "माय एफएम का बड़ा राजन' ही त्यांची स्वत:ची ओळख श्रोत्यांमध्ये लोकप्रिय ठरली. त्यांच्या मागे पत्नी, आई आणि एक मुलगा व एक मुलगी असा आप्त परिवार आहे. शो लोकप्रियतेच्या शिखरावर असतानाच राजनने अशी अचानक एक्झिट घेतल्याने रेडिओ आणि माध्यम जगताला जबर धक्का बसला आहे. स्थानिक धंतोलीस्थित न्यूरॉन इस्पितळात दाखल राजनचा मृत्यू हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने झाल्याची प्राथमिक शक्यता डॉक्टरांनी व्यक्त केली आहे. शनिवारी सकाळी आर. जे. राजन यांचा " माहोल मार्निंग' हा शो होता. त्या शोची लिंक त्यांनी घरून पाठवली. काही वेळेतच त्यांच्या पत्नीने त्यांची तब्येत खराब असल्याचा फोन केल्याने त्यांच्या ऐवजी आर. जे. आमोद देशमुख यांनी हा शो होस्ट केला. आर. जे. राजन यांनी डोके दुखत असल्याची तक्रार केल्याने घरच्यांनी त्यांना न्यूरॉन हॉस्पीटलमध्ये भरती केले. तिथे ब्रेन हॅमरेज तसेच हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांचे क्षणार्धात निधन झाले. माध्यम वर्तुळात, त्याच्या चाहत्यांना हा मोठा धक्का ठरला.
Post a Comment