"सत्तेलाही पूर येतो,पण पूर लवकर ओसरतो"गडकरींचा पक्षाला सावधगिरीचा सल्ला


नागपूर : पावसाळ्यात जसा पूर येतो तसा तो सत्तेलाही येतो. पण, जेव्हा सत्ता नसेल, आमदारकी किंवा मंत्रीपद नसेल, अशावेळी पक्षांसाठी काम करणारे कार्यकर्ते ही खरी पक्षाची ताकद आहे. आपल्याही नदीला सध्या पूर आहे. पाऊस संपला की पूर संपला आणि पूर लवकर ओसरतो", या शब्दात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी पक्षनेते व कार्यकर्त्यांना कानपिचक्या दिल्यात. नागपुरात आयोजित कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात बोलताना गडकरी यांनी अत्यंत परखडपणे सध्याच्या राजकीय परिस्थितीवर भाष्य केले आणि पक्षाला सावधगिरीचा सल्लाही दिला.सध्याच्या राजकीय परिस्थितीवर खुमासदार टिप्पणी करुन गडकरी म्हणाले, सध्या चंद्रशेखर बावनकुळेंपुढे तीन पक्ष आहेत. पहिला प्रश्न इथेच येणार आहे की, कोणती सीट कोणाला जाणार. सर्वांना काही ना काही दिले तर पार्टी वाढते, असे म्हटले जायचे. आता सारे लॉलिपॉपच संपले आहेत. पण, नेत्यांना चॉकलेट वाटण्याशिवाय पर्याय रहात नाही. मी सर्व प्रयोग करुन चुकलो आहे. आज जे बावनकुळे करताहेत. शंभर पदाधिकारी, आघाड्या वगैरे. आम्हीही चॉकलेट वाटले, पण उलटेच झाले. आम्ही चांगली मूर्ती घडवायला गेलो, फायनल आकार मिळाला तेव्हा गधा मिळाला, असे गडकरी म्हणाले. आज पक्षात जातीच्या अनेक आघाड्या तयार झाल्या आहेत. निवडणूक आली की, प्रत्येक आघाडीचे लोक बवनकुळेंना भेटतील. आमचे काय? आम्हाला किती तिकिटे देणार? अशी विचारणा करतील. तिकीट मिळाल्यावर आमच्या जातीचे इतके टक्के लोक असल्याने तिकीट मिळाले, असे सांगतील. तिकीट न मिळाल्यास बावनकुळेंनी कापले असे सांगतील. आम्ही भोगून चुकलो आहोत. अजून आग लागलेली नाही, असा उल्लेखही गडकरी यांनी केला.

0/Post a Comment/Comments