राज्यस्तरीय सार्वजनिक सत्यधर्मिय विधीकर्ता प्रशिक्षण शिबीर उत्साहात संपन्न
(प्रतिनिधि:संभाजीनगर) : सत्यशोधक समाज संघाने महाराष्ट्रभर प्रशिक्षित व अभ्यासू सत्यधर्मीय विधिकर्ते निर्माण करावे असे प्रतिपादन प्राचार्य कृष्णा मालकर यांनी केले. सत्यशोधक समाज स्थापनेच्या शतकोत्तरी १५० वर्षाच्या औचित्याने आणि राजर्षि शाहु महाराज यांच्या जयंती निमित्ताने दिनांक ९ जुलै २०२३ रोजी छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद ) येथे सत्यशोधक समाज संघाचे मराठवाडयातील पहिले राज्यस्तरीय सार्वजनिक सत्यधर्मीय विधीकर्ता प्रशिक्षण शिबीर छत्रपती संभाजी नगर येथील विवेकानंद महाविद्यालयात उत्साहात संपन्न झाले. त्याप्रसंगी प्रशिक्षण शिबिराचे उद्घाटकीय मार्गदर्शन करतांना प्राचार्य कृष्णा मालकर हे बोलत होते. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ विधीकर्ते भगवान रोकडे (चाळीसगाव) असून प्रमुख अतिथी दैनिक लोकमत वरिष्ठ पत्रकार स. सो. खंडाळकर, अनिता देवतकर, संगिता खोबरे मान्यवर इ. उपस्थित होते. प्रास्ताविकात सत्यशोधक समाज संघाचे संस्थापक अध्यक्ष अरविंद खैरनार म्हणाले की, सत्यशोधक चळवळीचं व महापुरुषांचं स्वप्न सत्यशोधक समाज संघ पूर्ण करण्यास कटीबद्ध आहे. तद्नंतर खैरनार यांनी मार्च २०२२ मध्ये महाराष्ट्रातील धरणगाव येथे जळगाव जिल्हास्तरीय प्रथम विधीकर्ता प्रशिक्षणाची यशस्वीता सांगून संमेलनामुळे सामाजिक परिवर्तनाला दिशा मिळाल्याचे समाधान व्यक्त केले. शिबीराचा शुभारंभ खंडोबाची तळी उचलून व सार्वजनिक सत्यधर्माची महात्मा ज्योतिबा फुले लिखित सामुदायिक प्रार्थनेचे अनुगायन रोकडे यांनी घेतल्यानंतर शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. तत्पूर्वी महापुरुषांच्या प्रतिमांना मान्यवरांनी पुष्पहार अर्पण केले. प्रा. गुलाबराव पाटील, प्रा. विजय महाजन, सत्यशोधक जयप्रकाश शित्रे यांनी मौलिक विचार मांडले प्रशिक्षणार्थी सुनिता गोरे (छ. संभाजी नगर), मिलींद कांबळे (परभणी), एन. आर. फाळके (सिल्लोड), मंडलिक आष्टी यांनी प्रशिक्षणातून प्रबोधनाची कृतीशील दिशा व मान्यवरांच्या मार्गदर्शनातून वैचारीक संघर्षासाठी नवचैतन्य मिळाल्याच्या भावना उत्स्फूर्तपणे व्यक्त केल्या. सदरहू विधीकर्ता प्रशिक्षणासाठी जळगाव, परभणी, जालना, बीड व छ. संभाजी नगर यांसह महाराष्ट्रातून प्रशिक्षणार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. सत्यशोधक संघाचे प्रधान ज्येष्ठ विधीकर्ते भगवान रोकडे (चाळीसगाव) व विधीकर्ते साळुबा पांडव (औरंगाबाद ) यांनी सत्यधर्मीय पद्धतीने साखरपुडा, विवाह, गृहप्रवेश, दशपिंड, वर्षश्राद्ध इ. विधींचे प्रात्यक्षिकासह प्रशिक्षण दिले. प्रशिक्षणार्थींना सहभाग प्रमाणपत्र, सत्यधर्म विधी पुस्तक, वही पेन व सत्यधर्मीय दिनदर्शिका प्रदेश अध्यक्ष अरविंद खैरनार, संमेलनाध्यक्ष भगवान रोकडे व मान्यवरांच्या हस्ते वितरीत करण्यात आले.
सुत्रसंचालन रामेश्वर तिरमुखे आणि आभार प्रदर्शन सत्यशोधक जयप्रकाश शित्रे यांनी केले. शिबिराच्या यशस्वीतेसाठी साळूबा पांडव, रामेश्वर काळे, उमेश उबाळे, प्राक्तन पांडव यांनी परिश्रम घेतले.प्रशिक्षणास सत्यशोधक संघाचे संस्थापक प्रदेश सचिव डॉ. सुरेश झाल्टे, सत्यशोधक समाज संघाचे जळगाव जिल्हा समन्वयक मुख्य पी. डी. पाटील सर, व कैलास जाधव यांनी अनमोल सहकार्य केले.
Post a Comment