मुंबई : महायुतीमधील राज्यपाल नियुक्त 12 आमदारांच्या नियुक्तीचा फॉर्म्युला तयार झाल्याची माहिती असून भाजपच्या वाट्याला 6 तर तर शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या वाट्याला प्रत्येकी 3 आमदारांची नियुक्ती येणार असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली. विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनानंतर राज्यपाल नियुक्त आमदारांची नियुक्ती होण्याची शक्यता आहे. तिन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाल्यानंतर राज्यपालांना यादी पाठवली जाणार आहे. महाविकास आघाडीच्या काळात हा मुद्दा चांगलाच गाजला होता. तत्कालीन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी या मुद्यावर निर्णयच घेतला नाही. त्यामुळे प्रकरण कोर्टात गेले होते. आता न्यायालयाने हिरवी झेंडी दाखविल्याने नियुक्त्यांचा मार्ग मोकळा झाला आहे.विधानपरिषदेच्या रिक्त जागांवर नियुक्ती करण्याचा अधिकार घटनेने राज्यपालांना दिला आहे. तथापि, ही नियुक्ती मुख्यमंत्र्यांच्या सल्ल्यानुसारच करावी लागत असल्याने त्यात अंतिम निर्णय सरकारचाच असतो. मविआ सरकारच्या कार्यकाळात राज्यपाल नियुक्त आमदारांचा मुद्दा गाजला होता. राज्यात ठाकरे सरकार असताना राज्यपाल नियुक्त 12 आमदारांची यादी तत्कालीन राज्यपाल भगत सिंह कोशारी यांनी मंजूर केली नव्हती. दरम्यान, भाजप,शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडून या जागांवर कोणाची वर्णी लागते याची उत्सुकता आहे.
Post a Comment