ना चालकाला कळालं ना प्रवाशांना समजलं; अर्धवट छत उघडलेली एसटी बस धावत राहिली


गडचिरोली : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाची (MSRTC) एसटी बस सतत काहीना काहीतरी विषयावरून चर्चेत असते. त्यात आता गडचिरोलीमध्ये एसटी बसचे  छत अर्धवट उघडल्याचे पाहायला मिळाले. पण हे अर्धवट छत उघडलेली ही बस तरी देखील रस्त्यावरून धावतच होती. यादरम्यान बसच्या पुढून जात असलेल्या वाहनात बसलेल्या व्यक्तीने त्याचा व्हिडिओ बनवला.गडचिरोलीमध्ये एसटी बसचे छत अर्धवट उघडले गेले होते. याचा व्हिडिओही मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला. या व्हिडिओमध्ये बसचे छत वाऱ्याने हलताना दिसत आहे. यातील विशेष बाब म्हणजे जेव्हा छत उडालेली ही बस धावत होती, तेव्हा चालकाला काहीही समजले नाही. इतकेच नाहीतर बसमधील प्रवाशांनाही ही बाब समजली नाही. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर एसटी प्रशासनाने तातडीने गंभीर दखल घेतली. त्यात मेकॅनिकल इंजिनिअरिंग विभागाच्या एका अधिकाऱ्याला निलंबित करण्यात आले.एमएसआरटीसीचे व्यवस्थापकीय संचालक आणि उपाध्यक्ष शेखर चन्ने यांनी सांगितले की, बस गडचिरोली-अहेरी मार्गावर धावत होती. चालकाच्या कॅबच्या वरचा फायबरचा भाग तुटला. बाहेरील ॲल्युमिनियम छताचा भाग आणि छताचे आतील अस्तर चांगले होते. त्यामुळे ही बाब समजली नसावी. बस चालक आणि प्रवाशांना तुटलेल्या छताची माहितीही नव्हती. या घटनेच्या चौकशीचे आदेश देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

0/Post a Comment/Comments