समृद्धी महामार्गावरून राज ठाकरेंचा भाजपवर निशाणा


पुणे : समृद्धी महामार्गांवरील अपघातांवरुन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भाजपवर निशाणा साधला. राज ठाकरे म्हणाले, या महामार्गाचे उद्घाटन घाईत कशाला केले, समृद्धीवर मृत्यूमुखी पडलेल्या लोकांची जबाबदारी भाजप घेणार का?, महामार्ग सुरु करण्यापूर्वी काळजी का घेतली नाही. रस्ता बनला नाही अन् टोल वसुली सुरु आहे. लोक मेले तर मरुद्यात, असे सध्या सुरु असल्याची टीकाही त्यांनी केली. मनसे  अध्यक्ष राज ठाकरे आज पुणे दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी भाजपसोबत युती होणार नसल्याचे स्पष्ट केले. कुणी कुणाला भेटले म्हणून युती होत नाही, असेही ते म्हणाले.राज ठाकरे म्हणाले, महाराष्ट्रातील अनेक रस्त्यावर खड्डे आहेत. तुम्ही कशावर टोल घेता?, यावर भाजप बोलणार आहे का. प्रश्न भाजपला विचारले पाहिजेत. 17 वर्ष झाले मुंबई-गोवा रस्त्याचे काम सुरु आहे. 17 वर्ष कोणत्या रस्त्याला लागतात का? असा सवालही त्यांनी केला. अमित ठाकरे यांच्या दौऱ्यात सिन्नर टोलनाका फोडल्याचा प्रकार घडला. त्यावर बोलताना राज ठाकरे म्हणाले, अमित राज्यभर दौरे करत आहे. तो प्रत्येक ठिकाणी टोल फोडत चालला असे नाही. केवळ एका टोलनाक्यावर असा प्रकार घडला. फास्टॅग असून अमितला अडवले. यावेळी समोरून एकजण उद्धट बोलत होता. त्याची ती प्रतिक्रिया होती, असे स्पष्टीकरण त्यांनी दिले.भाजपने निवडणुकीत टोलमुक्त महाराष्ट्राची घोषणा दिली होती. त्याचं पुढे काय झालं?. म्हैसकर कुणाच्या जवळचे आहेत?, त्यांनाच सर्व कंत्राट कसे मिळतात, असा सवालही त्यांनी केला. केंद्रात महामार्गाचा मंत्री मराठी असताना महाराष्ट्रातील रस्त्यावर खड्डे आहेत. टोलचे पैसे नेमके कुणाला मिळतात, यावर भाजप काही बोलणार आहे का?, असा प्रश्न राज ठाकरे यांनी उपस्थित केला.

0/Post a Comment/Comments