नवी दिल्ली : मंत्रिपद न मिळाल्याने नाराज असलेले प्रहार जनशक्ती पार्टीचे आमदार बच्चू कडू यांनी मंत्रिपदावरील दावा सोडत असल्याची भूमिका मंगळवारी जाहीर केली. कडू म्हणाले की, मुख्यमंत्री अडचणीत आहेत. मंत्रिपदासाठी ओढाताण सुरु आहे. मी मंत्रिपदाचा दावा सोडत आहे, हे मी आज जाहीर करतो. मला मंत्रालय दिलंय त्यामुळं मी दावा सोडतो. माझ्या जागी हवे तर आमदार राजकुमार पटले यांना राज्यमंत्रीपद द्यावे, अशी मागणी कडू यांनी केलीय. एनडीएच्या बैठकीसाठी बच्चू कडू सध्या दिल्लीत आहेत. तेथेच त्यांनी ही घोषणा केली. बच्चू कडू यांनी सांगितले की, मुख्यमंत्र्यांशी चर्चा झाली आहे. 40-50 आमदार आहेत. मंत्रीपदे कमी आहेत. आमदारांमध्ये मंत्रीपदासाठी प्रचंड चढाओढ चालू आहे. या सगळ्यात माझी भूमिका एका मित्राची आहे. त्यांनी दिव्यांग मंत्रालय दिले ही मोठी बाब आहे. त्यांची अडचण दूर झाली पाहिजे म्हणून मी मंत्रीपदाचा दावा सोडला आहे, असेही ते म्हणाले. 13 जुलै रोजीच कडू यांनी मंत्रीपदावरील दावा सोडणार असल्याचे स्पष्ट संकेत दिले होते.
Post a Comment