नवी दिल्ली : माणुसकीला काळीमा फासणारी घटना मणिपूरमध्ये समोर आली असून जमावाने दोन महिलांची नग्न धिंड काढत त्यांच्यावर सामूहिक बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. सर्वोच्च न्यायालयानेही या प्रकरणाची दखल घेत संताप व्यक्त केला.सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी या घटनेवर संताप व्यक्त करत सरकारला तातडीने कारवाई करण्याचे निर्देश दिलेत.सरकारने कारवाई न केल्यास आम्ही करु,अशी तंबीही न्यायालयाने दिलीय. याप्रकरणी मे महिन्यापासूनच कारवाई व्हायला हवी होती,असेही त्यांनी म्हटले आहे.सर्वोच्च न्यायालय म्हणाले, मणिपूरमध्ये महिलांसोबत जे काही झाले ते पूर्णपणे अस्वीकार्य आहे.आम्ही सरकारला कारवाई करण्यासाठी थोडा वेळ देऊ. नाही तर आम्हाला कारवाई करावी लागेल, असेही न्या. चंद्रचूड म्हणाले. न्यायालय म्हणाले, जातीय संघर्षामध्ये महिलांचा वस्तू म्हणून वापर करणे, हे संविधानाचे उल्लंघन आहे. या घटनेचा जो व्हिडिओ व्हायरल होत आहे, तो अतिशय अस्वस्थ करणारा आहे.या घटनेवर सरकारने कारवाई न केल्यास आम्ही करु. केंद्र सरकार आणि मणिपूर सरकारने या घटनेला जबाबदार असलेल्या लोकांवर कारवाई करून न्यायालयाला माहिती देण्याचे निर्देशही न्यायालयाने दिले आहेत.या प्रकरणावरील सुनावणी पुढील शुक्रवारपर्यंत तहकूब करण्यात आली आहे.
Post a Comment