मुंबई : राज्यात गेल्या आठ दिवसांपासून खाते वाटपावरून गोंधळ सुरू आहे. अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील एक गट शिंदे सरकारमध्ये सामील झाल्यानंतर या गटातील नऊ आमदारांना मंत्रिपदाची शपथ देण्यात आली होती. त्यानंतर राष्ट्रवादीला खाते देण्यावरून शिंदे गट आणि राष्ट्रवादीत जुंपली होती. अजित पवार यांना अर्थ खातं देण्यास शिंदे गटाने जोरदार विरोध केला होता. मात्र, आता खाते वाटपाचा तिढा सुटला आहे. अजित पवार यांनाच अर्थ खातं देण्यात आलं आहे. तर धनंजय मुंडे यांच्याकडे कृषी खाते देण्यात आले आहे. शिंदे गटाकडील कृषी खातं आपल्याकडे खेचून आणण्यात अजित पवार गटाला यश आलं आहे. शिंदे गटासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा निवासस्थानी तीन दिवस मध्यरात्री बैठका पार पडल्या. या दरम्यान खाते वाटपावर चर्चा करण्यात आली. मात्र, त्यातून तोडगा निघाला नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर अजित पवार यांना अर्थ खातं न देण्याचा आमदारांचा दबाव होता. ज्या कारणासाठी महाविकास आघाडीतून आणि शिवसेनेतून बाहेर पडलो, तेच खातं आता अजित पवार यांना जाणार असेल तर मतदारसंघात मतदारांना काय उत्तर द्यायचं? असा सवाल या आमदारांकडून केला जात होता. त्यामुळे अजित पवार यांना अर्थ खातं देऊच नये, असा तगादा आमदारांनी लावल्याने खाते वाटपाचा तिढा सुटण्याची शक्यता नव्हती.त्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी दिल्लीत जाऊन केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याशी चर्चा केली. त्यानंतर खाते वाटपाचा तिढा सुटला. अर्थ खातं आपल्याकडे घेण्यास अजित पवार यशस्वी ठरले.
राष्ट्रवादीला मिळालेली खाती
अजित पवार - अर्थ, नियोजन
छगन भुजबळ - अन्न आणि नागरी पुरवठा, ग्राहक संरक्षण
धर्मरावबाबा आत्राम - औषध व प्रशासन
दिलीप वळसे पाटील - सहकार
धनंजय मुंडे - कृषी
हसन मुश्रीफ - वैद्यकीय शिक्षण
अनिल पाटील - मदत आणि पुनर्वसन, आपत्ती व्यवस्थापन
आदिती तटकरे - महिला आणि बालकल्याण
संजय बनसोडे - क्रीडा व युवक कल्याण, , बंदरे
Post a Comment