पुणे : संरक्षण संशोधन आणि विकास संघटनेचे (डीआरडीओ) संचालक, वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. प्रदीप कुरुलकर यांनी पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणेतील हेर झारा दासगुप्ता हिच्याशी समाजमाध्यमांद्वारे साधलेल्या संवादाची प्रत राज्य दहशतवाद विरोधी पथकाने न्यायालयात दाखल केलेल्या दोषारोपपत्रात जोडली आहे. या संवादातून कुरुलकर यांनी झाराबरोबर अग्नी, ब्रह्मोस, रुस्तम या क्षेपणास्त्रांविषयी चर्चा केल्याची धक्कादायक माहिती उघडकीस आली आहे.
दरम्यान, शुक्रवारी विशेष न्यायालयाने कुरुलकर यांच्या न्यायालयीन कोठडीत २१ जुलैपर्यंत वाढ करण्याचे आदेश दिले. ‘एटीएस’ने कुरुलकर यांच्याविरुद्ध विशेष न्यायाधीश व्ही. आर. कचरे यांच्या न्यायालयात एक हजार ८३७ पानांचे दोषारोपपत्र नुकतेच दाखल केले. कुरुलकर यांना गोपनीय कामकाज, सुरक्षा नियमावलीची माहिती होती. ‘डीआरडीओ’ने विकसित केलेल्या प्रकल्पांची संवेदनशील माहिती त्यांनी पाकिस्तानी हेर झारा हिला दिली. कुरुलकर यांना मधुमोहजालात अडकविणारी झारा दासगुप्ता हिला या प्रकरणात सहआरोपी करण्यात आले आहे.
शत्रूराष्ट्राला संवेदनशील गोपनीय माहिती दिल्यास देशाच्या सुरक्षितेतला धोका पोहोचण्याची शक्यता आहे. गोपनीय माहिती शत्रूराष्ट्राला पुरविणे गंभीर गुन्हा आहे, हे कुरुलकर यांना माहीत होते. कुरुलकर यांनी सुरक्षाविषयक नियमावलीचे उल्लंघन करून शत्रूराष्ट्राला गोपनीय माहिती पुरविल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. कुरुलकर यांनी समाजमाध्यमातील संपर्क सुविधेद्वारे पाकिस्तानी हेर झारा दासगुप्ता हिला संवेदनशील माहिती पुरविली आहे. त्यांच्याविरुद्ध शासकीय गुपिते अधिनियम १९२३ चे कलम ३ (१) नुसार दोषारोपपत्र दाखल करण्यात आले आहे.
Post a Comment