यवतमाळ : गेल्या अनेक वर्षांपासून स्वतंत्र विदर्भ राज्य निर्माण करण्यात यावे यासाठी आंदोलन करण्यात येत आहे. आमची सत्ता आल्यास विदर्भ राज्य देऊ असे आश्वासन देऊन भाजप सत्तेत आली. परंतु, सत्ता मिळताच विदर्भ राज्याचा विसर पडला. त्यामुळे स्वतंत्र विदर्भ राज्य संघर्ष समितीने 9 ऑगस्ट रोजी आंदोलन करण्याची हाक दिली असून, 31 डिसेंबर पर्यंत विदर्भ राज्याचा संकल्प करण्यात आला अशी माहिती माजी आमदार वामनराव चटप यांनी दिली. वीज दरात 37 टक्के वाढ करण्यात आली आहे. शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी जाहीरनाम्यात घोषणा केली जाते. त्याची अंमलबजावणी होत नाही. त्यामुळे शेतकरी आत्महत्या कमी होत नाही. शेतकऱ्यांसह अनेक प्रश्न मार्गी लावायचे असतील तर स्वतंत्र विदर्भ राज्याशिवाय पर्याय नाही. या आंदोलनात युवकांनी सहभागी व्हावे असे आवाहन माजी आमदार ऍड. चटप यांनी केले आहे.
Post a Comment