बुलढाणा : मलकापूर शहरातील महामार्ग क्रमांक सहा वरती दोन ट्रॅव्हल्सच्या बसची समोरासमोर धडक झाली. या भीषण अपघातात सहा प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला असून सुमारे 30 जण जखमी झाले आहेत. दरम्यान मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना आज, शनिवारी पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास लक्ष्मी नगर उड्डाणपुलावर घडली. एमएच 08. 9458 ही बस अमरनाथची तीर्थयात्रा करून हिंगोलीच्या दिशेने जात होती. या ट्रॅव्हल्समध्ये 35 ते 40 प्रवासी होते. तर एमएच 27 बीएक्स 4466 या ट्रॅव्हल्समध्ये 25 ते 30 प्रवासी होते. ही ट्रॅव्हल्स नागपूरहून नाशिकच्या दिशेने जात असताना मलकापूर शहरातून जाणाऱ्या महामार्ग क्रमांक सहावरती समोरासमोर धडकून भीषण अपघात झाला. या अपघातामध्ये दोन्ही ट्रॅव्हल्स समोरासमोर भिडल्याने अक्षरश: चुराडा झाला. या भीषण अपघातात सहा प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला आहे. अपघाताची माहिती मिळताच शहर पोलीस निरीक्षक अशोक रत्नपारखी, दसरखेड एमआयडीसीचे पोलीस अधिकारी आणि कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले.
Post a Comment