धरणगाव : प्रतिनिधी
धरणगाव : येथील कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालय धरणगाव येथे आई क्यू ए सी व वाणिज्य विभाग आयोजित एक दिवसीय उद्योजकता व नेतृत्व क्षमता विकसन कार्यशाळेच्या उद्घाटन प्रसंगी जळगाव जिल्ह्यातील सुप्रसिद्ध उद्योजक श्री. श्रीराम पाटील यांनी उद्योजक होण्यासाठी समाजातील घटकांचे निरीक्षण करणे व आपल्या कामांमध्ये सातत्य राखणे हीच यशाची गुरुकिल्ली असल्याचे प्रतिपादन केले.
विद्यार्थ्यांमध्ये उद्योजकता विकसित व्हावी व उद्योजक म्हणून यशस्वी होण्यासाठी कोणते गुण अंगी बाळगणे आवश्यक आहे याविषयी श्री. श्रीराम पाटील यांनी या कार्यशाळेत वेगवेगळ्या उदाहरणांच्या माध्यमातून मार्गदर्शन केले.सध्याच्या काळात इंग्रजी भाषेवर प्रभुत्व नसतानाही केवळ आपले चेहऱ्यावरील हावभाव व आपली मनातील आंतरिक शक्ती,आत्मविश्वास याद्वारे आपण जगामध्ये कोणत्याही देशांमध्ये व्यवसाय करू शकतो हे त्यांनी स्वानुभावरून सांगितले.एक छोटा मेकॅनिक ते शंभर कोटी रुपये उलाढाल करणाऱ्या उद्योगाचा प्रमुख या काळात त्यांनी कोणकोणत्या संकटांना सामोरे गेले व त्या दरम्यान त्यांची मानसिकता कशी होती याविषयी त्यांनी विद्यार्थ्यांना सविस्तर माहिती दिली.सदर कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून प.रा. हायस्कूल सोसायटीचे अध्यक्ष डॉ. अरुणजी कुलकर्णी हे उपस्थित होते. त्यांनी विद्यार्थ्यांना भारताचे माजी राष्ट्रपती डॉ ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या उदाहरणामधून सातत्याने शिकत राहण्यास व त्यातून स्वतःमध्ये योग्य ते बदल घडवून आणण्यास प्रेरित केले व त्या आधारे विकसित भारताचे स्वप्न आपण पूर्ण करू शकू असा विश्वास व्यक्त केला.
या कार्यशाळेच्या निमित्ताने महाविद्यालय आणि सिका इंडस्ट्री जळगाव यांच्यात सामंजस्य करार करण्यात आला.ज्याद्वारे विद्यार्थ्यांना ऑन जॉब ट्रेनिंग, उद्योग समूहाला भेट देऊन शिक्षण, नोकरीची संधी यावर दोन्ही घटकांकडून प्रयत्न केले जाणार आहेत.
सदर कार्यशाळेच्या उद्घाटन प्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ ए.डी. वळवी, उपप्राचार्य प्रा एस. एस. पालखे, डॉ. प्रवीण बोरसे, डॉ. व्ही. ए. वारडे, प्रा. आर.एम.केंद्रे, डॉ. डी.आर. बोंडे, डॉ.ए. ए. जोशी, डॉ.डी.के. गायकवाड, डॉ. एस.एम.खरे, प्रा. विश्वजित वळवी, प्रा. राहुल केदार, प्रा.धनंजय कापडणे, प्रा.मोहन लहासे उपस्थित होते. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ.गौरव महाजन तर आभार प्रदर्शन डॉ. हर्षवर्धन भालेराव यांनी केले. वाणिज्य विभागातर्फे आयोजित या कार्यशाळेच्या यशस्वीतेसाठी ऍड.प्रा. प्रशांत क्षत्रिय यांनी मेहनत घेतली. दोनशे विद्यार्थ्यांनी या एकदिवसीय कार्यशाळेत सहभाग नोंदवला.
Post a Comment