हिंगोणे खुर्द येथे गुरु ; शिष्य जयंती जन्मोत्सवानिमित्त प्रबोधनपर व्याख्यान संपन्न

 

महापुरुषांना जाती-जातीत विभागून त्यांच्या विचारांची माती करू नका - पी.डी.पाटील


महापुरुषांचे जन्मोत्सव नाचून नव्हे तर वाचून साजरे करा - प्रा.जितेंद्र संदानशिव


(धरणगांव प्रतिनिधी) धरणगांव : धरणगाव तालुक्यातील हिंगोणे खुर्द या गावी ११ एप्रिल - सत्यशोधक महात्मा जोतीराव फुले व १४ एप्रिल - सत्यशोधक डॉ.बाबासाहेब आंबेडकर " गुरु - शिष्य जयंती " चे औचित्य साधून प्रबोधनपर व्याख्यानाचे आयोजन केले होते. व्याख्यानमालेचे प्रास्ताविक सरपंच अरुण शिरसाठ यांनी केले.

 कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी माजी सरपंच चुनीलाल पाटील होते. प्रमुख व्याख्याते म्हणून महात्मा फुले हायस्कूल धरणगाव शाळेचे आदर्श शिक्षक पी डी पाटील, अमळनेर येथील प्रताप महाविद्यालयाचे प्रा.जितेंद्र संदानशिव होते. प्रमुख अतिथी म्हणून धरणगाव तालुका अधिकृत पत्रकार संघाचे तालुकाध्यक्ष आबासाहेब राजेंद्र वाघ, माळी समाज पंच मधुकर माळी, ज्येष्ठ नागरिक ज्ञानेश्वर पाटील, पत्रकार निलेश पवार, राष्ट्रीय किसान मोर्चाचे तालुकाध्यक्ष गोरख देशमुख, नूतन प्राथमिक विद्यामंदिर चे उपशिक्षक तुषार पाटील उपस्थित होते.

 सर्वप्रथम कुळवाडीभुषण छत्रपती शिवराय, सत्यशोधक महात्मा जोतीराव फुले, ज्ञानज्योती सावित्रीमाई फुले, विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर या महामानवांचे मान्यवरांच्या हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले. गावाच्या वतीने व्याख्याते व प्रमुख अतिथींचा शाल पुष्पगुच्छ श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. व्याख्याते पी डी पाटील यांनी गुरु - शिष्य म्हणजेच तात्यासाहेब व बाबासाहेब यांचे शैक्षणिक सामाजिक कार्य विशद करून शिक्षणाचे महत्त्व सांगितले. महापुरुषांना जाती-जातीत विभागून त्यांच्या विचारांची माती करू नका. " सर्वसाक्षी जगत्पती - त्याला नकोच मध्यस्ती " या उक्तीप्रमाणे आपण सर्वांनी सत्यशोधक पद्धतीने विधी केले पाहिजे. या महामानवांचे अपूर्ण राहिलेले काम आपण पूर्ण करावे हीच महामानवांना खरी आदरांजली ठरेल.

 व्याख्याते प्रा.जितेंद्र संदानशिव यांनी महापुरुषांचे जन्मोत्सव नाचून नव्हे तर वाचून साजरे करा. शिवराय फुले शाहू आंबेडकर हेच आपले प्रेरणास्थान आहेत यांच्या विचारांवर चालून आपली व समाजाची प्रगती करा असा मोलाचा संदेश दिला. पुस्तकांवर प्रेम करा व आपले अज्ञान दूर करा. आपला मित्र व शत्रू ओळखा. या देशात बॅलेट पेपरवर निवडणुका झाल्या पाहिजेत. संविधान वाचविणे ही आपली नैतिक जबाबदारी आहे. व्याख्यानाला गावातील सर्व ग्रामस्थ बंधू-भगिनी, युवक - युवती मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या प्रबोधन पर व्याख्यानाचे सूत्रसंचलन सावित्रीमाईंची लेक कु.प्रतिक्षा महाजन तर आभार सरपंच अरुण शिरसाठ यांनी केले. व्याख्यानपुष्प यशस्वीतेसाठी एकता मित्र मंडळ, पंचशील मित्र मंडळ, एकलव्य मित्र मंडळ, सरपंच - उपसरपंच सर्व ग्रामपंचायत सदस्य व सर्व ग्रामस्थ हिंगोणे खुर्द यांनी सहकार्य केले.

0/Post a Comment/Comments