खपाट गावी वारुळे व जाधव परिवारात पहिलाच सत्यशोधक विवाह संपन्न


उच्चविद्याविभूषित सत्यशोधक हेमंत व सत्यशोधिका मनिषा यांचा क्रांतिकारी निर्णय गावासाठी प्रेरणादायी ; पी.डी.पाटील


(धरणगांव प्रतिनिधी) धरणगाव : तालुक्यातील वंजारी खपाट येथील जगन्नाथ नथ्थू पाटील यांचे चिरंजीव सत्यशोधक हेमंत आणि शिरपुर येथील महेंद्र आत्माराम माळी यांची कन्या सत्यशोधिका मनिषा यांचा सत्यशोधक विवाह मोठ्या थाटामाटात करून गावात प्रथमच सत्यशोधक विवाह विधीकर्ते शिवदास महाजन यांच्या हस्ते संपन्न झाला. शिवराय - फुले - शाहू - आंबेडकर विचारधारा जोपासत वधू-वरांनी व परिवाराने हा क्रांतिकारी निर्णय घेतला.

विवाह सोहळ्याला सुरुवातीलाच खंडेरायाची तळी भरून विवाह सोहळ्याची सुरुवात करण्यात आली.मंडपात येतांना वधू-वरांनी आपल्या हातात क्रांतीची मशाल घेऊन आगमन केले. सत्यशोधक हेमंत हा स्टेट बँक ऑफ इंडिया पुणे येथे कार्यरत असून मनीषा ही बी एस सी झालेली आहे. सुरुवातीला वधू-वरांच्या व माता - पित्यांच्या शुभहस्ते राजमाता जिजाऊ,कुळवाडीभूषण छत्रपती शिवराय, सत्यशोधक महात्मा जोतीराव फुले,ज्ञानज्योती सावित्रीमाई फुले, आरक्षणाचे जनक राजर्षी शाहु महाराज,विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर,राष्ट्रसंत गाडगेबाबा यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.

सत्यशोधक समाज संघाचे जिल्हा समन्वयक पी डी पाटील यांनी सत्यशोधक विवाह ही काळाची गरज बनली आहे."सर्व साक्षी जगत्पती - त्याला नकोच मध्यस्थी " हे सत्यशोधक समाज संघाचे ब्रीदवाक्य आहे. राष्ट्रपिता जोतीराव फुले यांच्या संकल्पनेनुसार कर्मकांड व अंधश्रद्धेपासून दूर राहावे व आपले विवाह आपणच मध्यस्तीविना घडवून आणावेत हा मोलाचा संदेश देऊन सत्यशोधक ज्योतिराव फुले यांचे सामाजिक - शैक्षणिक कार्य विशद केले व शेवटी सत्यशोधक समाजाची प्रार्थना सामुहीक गायली.माजी जि.प.सदस्य गोपाल चौधरी यांनी वधू-वरांना शुभेच्छा पर मनोगत व्यक्त करतांना दोन्ही कुटुंबाचे अभिनंदन व कौतुक केले.आपल्या गावात प्रथमच सत्यशोधक विवाहाची परंपरा सुरू झाली याचा सार्थ अभिमान आहे. सर्वांनी सत्यशोधक पद्धतीने विधी करावेत असे प्रतिपादन चौधरी यांनी केले.

 राष्ट्रपिता महात्मा जोतीराव लिखित सत्यशोधक मंगलाष्टके गाऊन विवाह पार पडला. वधू-वरांनी शपथ घेतली.विवाह सोहळ्याचे सर्व विधी हे सत्यशोधक पद्धतीने करण्यात आले.सत्यशोधक समाज संघाचे विधीकर्ते शिवदास महाजन,सत्यशोधक आबासाहेब राजेंद्र वाघ, गोरख देशमुख, कविराज पाटील,प्रल्हाद महाजन,पी.डी.पाटील यांच्या हस्ते वधू-वरांना शेवटी विवाह प्रमाणपत्र व अनमोल ग्रंथ भेट देण्यात आले.

 सत्यशोधक विवाह यशस्वीतेसाठी गोपाल नथु पाटील,दीपक वामन पाटील,निलेश वामन पाटील,निंबा सुखदेव पाटील, विशाल जाधव, धनराज महाजन, विनोद गोपाल पाटील,प्रवीण गोपाल पाटील, भटू पाटील, पप्पू पाटील यांनी परिश्रम घेतले.विवाह सोहळ्याचे सूत्रसंचलन परमेश्वर रोकडे यांनी केले.या सत्यशोधक विवाहाचे नातलग,आप्तेष्ट व गावात सर्वत्र कौतुक होत आहे.

0/Post a Comment/Comments