चाळीसगावात समता सैनिक दलाच्या वर्धापनदिनी धर्मभूषण बागुलांच्या नेतृत्वात मोटारसायकल रॅली




डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी स्थापन केलेल्या समता सैनिक दल या संघटनेच्या वर्धापन दिनानिमित्त दि. 13 मार्च 2023 रोजी चाळीसगाव शहरात संघटनेचे केंद्रीय प्रचारक धर्मभूषण बागुल यांच्या नेतृत्वाखाली मोटार सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या रॅलीत चाळीसगाव शहर व ग्रामीण भागातील शेकडो सैनिकांनी मोटार सायकलसह हातात निळे झेंडे घेवून सहभाग घेतला. रॅलीच्या अग्रभागी व शेवटी चार चाकी वाहने सजविण्यात आली होती.समता सैनिक दलाच्या केंद्रीय कार्यालयापासून रॅलीची सुरुवात करण्यात आली. रेल्वे स्टेशन, छ.शिवाजी महाराज चौक, नवा मालेगाव रोड, भडगाव रोड, खरजई नाका, हॉटेल दयानंद, घाट रोड, पीर मुसा कादरी बाबा दर्गा, रांजणगाव दरवाजा, बहाळ दरवाजा, नवा पूल, तहसील कचेरीमार्गे जावून रेल्वे स्टेशन येथे रॅलीचा समारोप करण्यात आला. वाहतुकीला कोणतेही अडथळे न येऊ देता रॅली अत्यंत शिस्तीत पार पडली. सहभागींनी समता साईंकिक दलाचा गणवेश परिधान करून लक्ष वेधून घेतले. याप्रसंगी केंद्रीय प्रचारक धर्मभुषण बागुल यांनी रॅलीत सहभागी झालेल्या समता सैनिक दल सैनिकांना मार्गदर्शन केले.

विश्वभुषण डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे कार्य एका जातीसाठी किंवा एका धर्मासाठी नव्हते. त्यांनी देशातील सर्व उपेक्षित जनतेला समतेचा, सन्मानाचा अधिकार मिळवून दिला. महिलांना सर्व प्रकारचे स्वातंत्र्य मिळवून दिले. मी सर्वात अगोदर भारतीय आहे आणि सर्वात शेवटी भारतीयच असेन ही भूमिका बाबासाहेबांनी मांडली आणि प्रत्यक्षात त्या तत्वाचा अंगीकार केला. सर्व भारतीय समान आहेत. आपण सर्व बांधव आहोत. समता, स्वातंत्र्य, बंधुता आणि न्याय या तत्त्वावर आधारित सामाजिक, राजकीय व प्रशासकीय व्यवस्था निर्माण झाली पाहिजे अशी डॉ.बाबासाहेब आंबेडकरांची आग्रही भूमिका होती. त्यामुळे त्यांनी लोकशाही व्यवस्थेचा सातत्याने पुरस्कार केला आणि देशात लोकशाही व्यवस्था निर्माण करण्यासाठी कठोर परिश्रम आणि संघर्ष केला. याच तत्वाने, याच विचारांनी आपण सर्वांना वाटचाल करावी लागणार आहे. अशी भूमिका बागुल यांनी आपल्या मार्गदर्शनात व्यक्त केली.

डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे पूर्णाकृती स्मारक रेल्वे स्टेशन येथे झाले पाहिजे असा ठराव मागील काळात चाळीसगाव न.पा.ने केला आहे. अद्याप त्यावर कारवाई सुरू झालेली नाही. येत्या 14 एप्रिल रोजी डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या दिनी न. पा. ने डॉ.आंबेडकर स्मारकाचे भूमिपूजन केले पाहिजे अशी मागणी यावेळी बागुल यांनी केली. अन्यथा न. पा. टाळे लावण्यात येईल असा इशारा देखील दिला आहे. चाळीसगाव शहरात क्रांतीसूर्य महात्मा फुले, राजर्षी शाहू महाराज, महाराणा प्रताप यांचे देखील स्मारक झाले पाहिजे. त्यासाठी देखील समता सैनिक दल पाठपुरावा व सनदशीर संघर्ष करणार असल्याचे जाहीर करण्यात आले. रॅलीत जिल्हा प्रचारक विजय निकम, जळगाव, किशोर डोंगरे, पाचोरा ,चंद्रशेखर आबा पाटील, धुळे, सचिन बागुल धुळे हे सहभागी झाले होते.

जिल्हा प्रचारक स्वप्नील जाधव, पितांबर झालटे यांच्यासह बाबा पगारे, नितीन मरसाळे, विशाल पगारे, महेंद्र जाधव, मनोज जाधव, दीपक बागुल, ज्ञानेश्वर बागुल, नेहा राठोड, राजु अहिरे, जितू महाले, विश्वजित जाधव, अजय पगारे, मनीष बागुल, उमेश जाधव, घनशाम बागुल यांनी रॅली यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले. नगरसेवक रामचंद्र जाधव, नगरसेवक रोशन जाधव, संभाआप्पा जाधव, ॲड. राहुल जाधव, देविदासतात्या जाधव, वसंतराव मरसाळे, गौतम जाधव, दिनेश मोरे, महेंद्र बिऱ्हाडे, शरद जाधव, बबलू जाधव, सागर निकम यांच्यासह शेकडो सैनिक मोटार सायकल वाहनासह रॅलीत सहभागी झाले होते.

चाळीसगाव शहर पोलिस स्टेशन व ट्रॉफीक शाखा यांनी चोख व्यवस्था ठेवली होती. त्याबद्दल त्यांचे देखील आभार मानण्यात आले.

0/Post a Comment/Comments