शहरातील मूलभूत सुविधा सोडविण्यासाठी आधिकारी नेमणार, सभापती कुलेवारांचा ॲक्शन प्लॅन



पालिकेतील पाण्याचे वॉटर फिल्टर शोसाठी आहे का ? तुमच्या घरी घेऊन जा सभापती अधिकाऱ्यांवर कडाडल्या


धुळे : शहरातील नागरिकांच्या मूलभूत सुविधा सोडवण्यासाठी मनपाच्या वतीने अधिकाऱ्याची नेमणूक करण्यात येणार असून त्या अधिकाऱ्याच्या व्हाट्सअप नंबर वर नागरिकांनी तक्रारी पाठवून त्या तक्रारीचे दोन दिवसात निवारण करण्यात येणार असल्याचा ॲक्शन प्लॅन स्थायी समिती सभापती किरण कुलेवार यांनी आखला आहे. त्याबाबतचे नियोजन करण्याचे आदेश त्यांनी मनपा प्रशासनाला दिले आहे. संबंधित अधिकाऱ्याने दोन दिवसात तक्रारीचे निवारण न केल्यास त्या अधिकाऱ्यावर कारवाई करण्याचा इशारा देखील सभापतींनी दिला आहे.  

दुपारी चार वाजता मनपाच्या सभागृहात स्थायी समितीची सभा आयोजित करण्यात आली होती. सभेतील सहाही विषयांना उपस्थित सदस्यांच्या संमतीने मंजूर करण्यात आले. या सभेत शहराच्या विकासाच्या दृष्टीने महत्त्वाच्या असणाऱ्या प्रश्नांवर अनेक सदस्यांनी प्रश्न उपस्थित करून सदरील समस्या सोडवण्याची मागणी केली आहे. शहरातील विस्कळीत झालेला पाणीपुरवठ्याच्या प्रश्नावरून अनेक सदस्यांनी सभागृहात प्रश्न उपस्थित केला. त्यावर सभापतींनी मनपातील वॉटर फिल्टर बाबत अधिकाऱ्यांना विचारणा करत पालिकेतील वॉटर फिल्टर शोपीस साठी आहे का ? तुमच्या घरी घेऊन जा. मनपात पाणी मिळत नसेल तर धुळ्याला काय पाणी देणार ? असा संतप्त सवाल अधिकाऱ्यांना करत त्यांच्यावर चांगल्ल्याच च कडाडल्या. 

मनपाच्या वतीने झालेल्या काम गुणवत्तापूर्वक आहे का ? त्या कामाची मनपा अधिकारी व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांकडून पाहणी करून दर्जेदार असेल तरच त्या कामांची बिले अदा करा . नित्कृष्ट दर्जाची कामे करणाऱ्या ठेकेदारांवर कारवाई करून कामांविषयी नागरिकांनी केलेल्या तक्रारीचे निवारण तात्काळ करण्यात यावे अशी मागणी सदस्य सुनील बैसाणे यांनी सभापतींकडे केली . यावर सभापतींनी देखील हा ठराव पारित केला आहे. 

सदस्य किरण अहिरराव यांनी देखील पाणीपुरवठा करणाऱ्या गाळणी निरीक्षक व फिटर यांची दोन महिन्यांपासून प्रलंबित असलेले मानधन देण्याची मागणी सभेत केली आहे. तर हज यात्रेसाठी जाणाऱ्या भाविकांसाठी मनपाच्या वतीने लसीकरण उपलब्ध करून देण्याची मागणी नगरसेविका मेहरुनिसा अंसारी यांनी सभेत केली. त्यांची मागणी सभापतींनी तात्काळ मान्य करत वैद्यकीय अधिकाऱ्याला सुचित केले. 

 याप्रसंगी स्थायी समिती सभापती किरण कुलेवार, आयुक्त देविदास टेकाळे, उपायुक्त डॉक्टर संगीता नांदुरकर, पल्लवी शिरसाठ, नगरसचिव मनोज वाघ, सदस्य सुनील बैसाणे, हर्ष कुमार रेलन, किरण अहिरराव, दगडू बागुल, नरेश चौधरी, साबीर शेख, वसीम अन्सारी , सदस्या कल्याणी अंपलकर, नाझिया पठाण, मेहरूनिसा अन्सारी, यांच्यासह अधिकारी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

0/Post a Comment/Comments