धरणगावात गुढीपाडव्याचा जोरदार उत्साह नववर्षाचे शोभायात्रा काढून केले जल्लोषात स्वागत




(धरणगाव प्रतिनिधी) धरणगाव : शहरात श्री बालाजी वहन व्यवस्थापक मंडळ, हिंदू नववर्ष स्वागत समितीच्या वतीने गुढीपाडव्यानिमित्त बुधवार रोजी सकाळी ७.०० वाजता श्री बालाजी मंदिर परिसरातून शोभायात्रा काढण्यात आली. नववर्षाच्या स्वागतासाठी गावातील सर्व सामाजिक संघटना, शाळा, महाविद्यालय, कीर्तनकार, भजनी मंडळ तसेच सर्व राजकीय पक्षाचे प्रतिनिधींसह, हिंदू बांधव पारंपरिक धोतर-सदरा, डोक्यावर भगवा फेटा, टोपी असा मराठमोळा पेहराव करून सहभागी झाले होते. जल्लोषाच्या वातावरणात शहरात ठिकठिकाणी विविध संस्थांनी नववर्षानिमित्त स्वागत कमानी उभारून शोभायात्रेतील बांधवांचे स्वागत केले जात होते. शहरातील धरणी चौक येथील राष्ट्रपिता ज्योतिबा फुले, विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, व छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकास बालाजी वहन व्यवस्थापक मंडळाचे अध्यक्ष प्रा.डी आर पाटील, उपाध्यक्ष गुलाबराव वाघ, कार्याध्यक्ष जीवनसिंह बयस, सचिव प्रशांत वाणी, सहसचिव अशोक येवले, खजिनदार किरण वाणी, संचालक भास्कर पवार, किरण सोनवणी,अरुण महाले, हभप, महंत भगवानदासजी महाराज, नगराध्यक्ष निलेश चौधरी आदींनी माल्यार्पण करून अभिवादन केले. या शोभायात्रेत तरुणाई मोठ्या प्रमाणात सहभागी झाल्याने वातावरणात आल्हाददायक चैतन्य निर्माण झाले होते. अनेक परिसरात भव्य रांगोळ्या काढण्यात आल्या असून त्यामधून पाणी वाचवा, स्वच्छता राखा, पर्यावरण वाचवा, पाण्याचे व्यवस्थापन, आरोग्य विषय, ऐतिहासिक, पौराणिक असे विविध संदेश देण्यात आले होते. शोभायात्रेत विवीध सामाजिक संघटना व राजकीय पक्षांचे पदाधिकारी व गावातील असंख्य नागरिक सहभागी होते.

0/Post a Comment/Comments