ठाकरे गटाकडून अडवला कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांच्या गाड्यांचा ताफा
शिवसैनिकांनी कृषिमंत्र्यांच्या ताफ्यावर कापूस व खोका दाखवित केला निषेध
पन्नास खोके एकदम ओकेच्या दिल्या घोषणा.
अब्दुल सत्तार यांनी काढता पाय घेतला.
(धरणगाव प्रतिनिधी ) धरणगाव: जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर असलेले राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांना पस्तीस वर्षापासून शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या धरणगाव शहरात शिवसेना, ठाकरे गटाचे सहसंपर्कप्रमुख गुलाबराव वाघ, युवासेना जिल्हाप्रमुख निलेश चौधरी, ॲड. शरद माळी, भागवत चौधरी, भरत माळी व शिवसैनिकांनी अब्दुल सत्तार यांच्या ताफा अडवला. यावेळी संतप्त शिवसैनिकांनी 'पन्नास खोके एकदम ओके' अशा जोरदार घोषणा दिल्या. त्यामुळे अब्दुल सत्तार यांना गाडीत बसून मार्गस्थ होण्याची वेळ आली. या प्रकारामुळे चांगलाच गोंधळ उडाला होता.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, धरणगावात राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांचा नुकसानग्रस्त शेत शिवारातील पाहणी दौरा आटोपल्यानंतर धरणगावात शिंदे गटाच्या कार्यालयात भेट देणार होते. परंतू ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी पारोळा नाका जवळील रस्त्यातच कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांचा ताफा अडवून, त्यांना खोके दाखवून आणि ताफ्यावर कापूस फेकून निषेध व्यक्त केला. यावेळी उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे शिवसेना सह संपर्कप्रमुख गुलाबराव वाघ, युवासेना जिल्हाप्रमुख निलेश चौधरी, उपजिल्हाप्रमुख ॲड. शरद माळी, शहरप्रमुख भागवत चौधरी, उपशहर प्रमुख भरत माळी, गोपाळ पाटील, आदींसह कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.
Post a Comment