वरणगाव जवळ एसटीच्या धडकेत तिघे तरुण ठार

 


भुसावळ : भरदाव एसटी बसने दुचाकीला धडक दिल्याने झालेल्या अपघातात बोदवड तालुक्यातील मनुर गावातील तिघे युवक जागीच ठार झाले आहे. हा अपघात सोमवार, दिनांक १३ मार्च २०२३ रोजी दुपारी १:३० वाजेच्या सुमारास वरणगाव जवळील सुसरी शिवारात घडला. या अपघाताने बोदवड तालुक्यातील मनुर बुद्रुक गावात मोठी शोककळा पसरली आहे. सचिन राजेंद्र शेळके (वय २६ वर्ष), भागवत प्रल्हाद शेळके (वय ४३ वर्ष) व जितेंद्र कैलास चावरे (वय ३२ वर्ष, तिघे रा. मनुर बुद्रुक तालुका बोदवड) अशी मयतांची नावे आहेत.

 मिळालेल्या माहितीनुसार, मनुर बुद्रुक येथील तरुणांचा वरणगाव जवळील पिंपळगाव येथे सोमवारी विवाह असल्याने वऱ्हाडी जमले होते, तर मनुर गावातील तिघे भावकीतील तरुणही लग्नस्थळी आले होते व लग्नाला दुपारी अवकाश असल्याने वरणगावातील नागेश्वर मंदिरावर दर्शनासाठी जातो म्हणून सचिन शेळके यांनी आपले काका विजय शेळके यांना सांगितले व अन्य दोघे मित्र असलेल्या नातेवाईकांसह दुचाकी एमएच १९ सी एस ११९८ ने वरणगावकडे येत असताना भरधाव भुसावळ-देवळरगाव बस क्रमांक एम एच २० बी एल ०९४८ ने समोरून जोरदार धडक दिल्याने तिघे तरुण रस्त्यावर फेकले गेले. बसची धडक इतकी जोरदार होती की, दुचाकीचा चक्काचूर झाला तर बसचा देखील चालकाकडील भाग चेपला गेला आहे. या अपघातात डोक्याला अधिक मार लागल्याने व रक्तस्त्राव झाल्याने दोघा तरुणांचा जागीच मृत्यू झाला तर भागवत शेळके हे बोलण्याच्या अवस्थेत असल्याने त्यांनी घडलेल्या अपघाताची माहिती दिल्यानंतर त्यांना वरणगाव ग्रामीण रुग्णालयात हलवले असता उपचारादरम्यान त्यांचाही मृत्यू झाला आहे.

 याप्रकरणी बस चालक दिलीप आप्पा काळे राहणार वरणगाव फॅक्टरी तालुका भुसावळ यास अटक करण्यात आली आहे. अपघाताची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली.  वरणगावच्या ग्रामीण रुग्णालयात युवकांचे मृतदेह आणण्यात आले, तर वरणगाव पोलीस स्थानकात याप्रकरणी नोंद करण्याचे काम सुरू होते. पुढील तपास पी.आय आशीष अडसूळ करीत आहेत.

0/Post a Comment/Comments