साक्रीत जागतिक ग्राहक दिन साजरा
धुळे : वस्तुंची खरेदी करतांना होणारी फसवणुक टाळण्यासाठी ग्राहकांनी नेहमी सजग राहिले पाहिजे. असे प्रतिपादन अपर जिल्हाधिकारी देवदत्त केकाण यांनी केले.
जागतिक ग्राहक हक्क दिनानिमित्त अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग, तहसील कार्यालय, साक्री यांच्यातर्फे आज सकाळी राजश्री शाहु महाराज सभागृह, तहसिल कार्यालय, साक्री, ता. साक्री, जि. धुळे येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते, यावेळी ते बोलत होते. यावेळी ग्राहक पंचायतीचे नाशिक विभागाचे अध्यक्ष डॉ. अजय सोनवणे, ग्राहक पंचायतीचे धुळे जिल्हाध्यक्ष ॲड जे. टी. देसले, जिल्हा पुरवठा अधिकारी गोविंद दाणेज, तहसीलदार आशा गांगुर्डे, पोलीस निरीक्षक रविंद्र देशमुख, नायब तहसीलदार राहुल मोरे आदि उपस्थित होते.
अपर जिल्हाधिकारी श्री. केकाण म्हणाले, ग्राहक हा राजा असतो त्यामुळे दैनंदिन जीवनात ग्राहकांनी वस्तू खरेदी करतांना काळजीपूर्वक खरेदी केली पाहिजे. खरेदीच्या बाबतीत ग्राहकांने नेहमीच सजग असावे जेणेकरुन भेसळीस आळा बसण्यास मदत होते. ग्राहकांना आपल्या हक्कांची जाणीव असल्यास कायद्याचीही प्रभावी अंमलबजावणी होण्यास मदत होते.
ग्राहक पंचायतीचे नाशिक विभागाचे अध्यक्ष डॉ. अजय सोनवणे यांनी ग्राहकांच्या आठ मूलभूत हक्कांची माहिती दिली. त्याचबरोबर पर्यावरणाच्या रक्षणासाठी प्रत्येक नागरीकांने एक झाड लावण्याचे व जगविण्याचे आवाहन केले.
ग्राहक पंचायतीचे जिल्हाध्यक्ष ॲड जे. टी. देसले यांनी ग्राहक चळवळीची पार्श्वभूमी विशद केली. त्याचबरोबर आपण बॅकेत कर्जासाठी अर्ज सादर करतो त्याठिकाणी आपला सीबील स्कोअर तपासणी करुनच आपल्याला कर्ज मंजुर केले जाते. त्याचप्रमाणे आपण वस्तू खरेदी करतांना वस्तुची गॉरंटी आणि वॉरंटी या दोन बाबींची आपण माहिती जाणून घेणे आवश्यक आहे. जिल्हास्तरावर ज्याप्रमाणे ग्राहक कक्ष स्थापन करण्यात आले आहे त्याचधर्तीवर तालुकास्तरावरही ग्राहक कक्ष स्थापन करण्याबाबत शासनास निवेदन देण्यात आल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली. यावेळी विद्यार्थींनीही आपले विचार मांडलेत.जागतिक ग्राहक दिनानिमित्त आयोजित विविध स्पर्धेतील विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र वितरीत करण्यात आले. ग्राहक दिनानिमित्त साक्री तहसील कार्यालयाच्या आवारात विविध विभागांचे स्टॉल मांडले होते त्यांची पाहणी मान्यवरांनी केली. सि. गो. पाटील महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी महाराष्ट्र गीताचे गायन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा पुरवठा अधिकारी गोविंद दाणेज यांनी तर उपस्थितांचे आभार नायब तहसीलदार राहुल मोरे यांनी मानले. कार्यक्रमाचा समारोप पसायदान ने करण्यात आला. यावेळी विविध विभागांचे अधिकारी, स्वस्त धान्य दुकानदार, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Post a Comment